वचन पूर्ण झालं म्हणून मी काय दुकान बंद करुन बसणार नाही, मला शिवसेना वाढवायची आहे – ठाकरे 

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतरच्या ह्या पहिल्याच जाहीर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपावरही टीका केली आहे.

दरम्यान, पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले का नाही होणार? अन्यथा माझ्या लढाईला काय अर्थ आहे. शिवेसनाप्रमुखांना दिलेलं वचन अद्याप कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे, पक्षप्रमुख आहे. मी मुख्यमंत्री होईन असं म्हटलं नव्हतं. पण आता वचन पूर्ण झालं म्हणून मी काय दुकान बंद करुन बसणार नाही. मला शिवसेना वाढवायची आहे आणि तो प्रयत्न जर मी सोडणार असेन तर मग पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही.

मुख्यमंत्रीपद सोडण्यास तुम्ही तयार होता का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचीही माझी तयारी नव्हती. पण त्या काळात जिद्दीने मी केलं. मी इच्छेने नाही तर जिद्दीने मुख्यमंत्री झालो. माझ्या परीने मी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.