नागपुरातील उमेदवार माघारी म्हणजे पराभवाची नामुष्की अपक्षाच्या माथी मारून दुबळेपण लपविण्याचे राजकारण !

नागपूर – विधान परिषदेच्या दोन जागांवर होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने आहेत. नागपूर आणि अकोला- बुलढाणा -वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान,  नागपुरात काँग्रेसनं काल (गुरुवारी) ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.काँग्रेसने तसं पत्रक देखील काढलं आहे. छोटू भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत कॉंग्रेसला चिमटा काढला आहे. ते म्हणाले, नागपूर विधानपरिषद निवडणूकीत कॉंग्रेसने उमेदवार बदलला. खर म्हणजे छोटू भोयर असमर्थ आहेत नाहीत यापेक्षा कॉंग्रेसच समर्थ नाही हेच यातून स्पष्ट झाले. नागपुरातील उमेदवार माघारी म्हणजे पराभवाची नामुष्की अपक्षाच्या माथी मारून दुबळेपण लपविण्याचे राजकारण ! असल्याचं सांगत उपाध्ये यांनी कॉंग्रेसला डिवचले आहे.