‘तत्थ्यहीन तक्रारीतून काँग्रेस प्रवक्त्याचा बालिशपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला’

नागपूर – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारद्वारे राज्यात राजरोसपणे वसुली सुरू आहे. १०० कोटीच्या वसुली प्रकरणातील आरोपी असलेले अनिल देशमुख कारागृहात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे किरीट सोमय्या यांनी जाहिर केले. या सरकारचा भ्रष्टाचारी कारभार सर्वश्रुत असताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते म्हणवून घेणारे अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्याद्वारे तीनही पक्षांची बदनामी केली जात असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात नागपूर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती. ही तक्रार तत्थ्यहीन असल्याचा निर्वाळा देत मा. न्यायालयाने लोंढेंची तक्रार याचिका खारीज केली. एकूणच राजकीय आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अतुल लोंढे यांनी ही तक्रार याचिका दाखल केल्याचे आता स्पष्ट झाले असून काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्याचा बालिशपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे, असा टोला भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी लगावला.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपावर न्यायालयात जाण्याची धमकी देणे आणि पुढे न्यायालयाने त्यांची तक्रार याचिकाच फेटाळून लावणे या अतुल लोंढे यांच्या कृतीचा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.

एका मुलाखती दरम्यान किरीट सोमय्या राज्य सरकारकडे वसुलीचा जो पैसा येतो, त्यातील ४० टक्के राष्ट्रवादी कॉंग्रेसला, ४० टक्के शिवसेनेला आणि २० टक्के हिस्सा कॉंग्रेसला जातो, असा आरोप केला असल्याचे सांगून अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या कथित विधानाविरूद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली व न्यायालयात जाण्याची धमकीही दिली होती. या संपूर्ण कृतीचा भाजपाचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी त्यावेळी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाचारही घेतला होता. काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्त केलेले अतुल लोंढे यांचे मुख्य प्रवक्ता पदासाठी वाद असताना लोंढे यांनी मुख्य प्रवक्ता पदाचे महत्व समजून न घेता केवळ आपली उपस्थिती दाखविण्याच्या नादात अशा प्रकारचा आरोप करणे आणि न्यायालयात जाण्याची धमकी देणे किंवा पोलिस आयुक्तांकडे तक्रार हे त्यांना राजकीय शहाणपणा व समज नसल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले होते.

अतुल लोंढे यांनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी किरीट सोमय्या यांचे विरोधात नागपूर येथील न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड विधान च्या कलम ४९९, ५०३, ५०४ व ५०५ (i) अंतर्गत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणीही लोंढे यांनी तक्रारीद्वारे मा. न्यायालयाला केली होती. या संपूर्ण प्रकरणावर न्यायालयात मा. न्यायाधीश श्रीमती एस.एस.गवई यांनी महत्वपूर्ण निर्णय देत लोंढे यांची तक्रार याचिका फेटाळून लावली.

मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशात काही निष्कर्ष जारी केले आहेत. त्यानुसार अतुल लोंढे यांच्या तक्रारीतील आरोप हे निश्चित स्वरूपाचे नसून संदिग्ध असणे, तक्रारीतील आरोप कोणत्याही व्यक्तिविशेषच्या विरोधात असलेले आढळून येत नसणे, तक्रारीत नमूद केलेल्या तथाकथित वक्तव्यामुळे कोणाची बदनामी होत आहे किंवा कोणाचा जाणीवपूर्वक अपमान होत आहे किंवा कोणाला धमकी देण्यात येत आहे किंवा कोणत्याही व्यक्ती व व्यक्तींच्या समूहविरोधात शत्रुत्व, द्वेष व गैरभावना पसरविण्यात येत आहे असे दिसून न येणे, तक्रारीतील आरोप भारतीय दंड विधान च्या कलम ४९९, ५०३, ५०४ व ५०५ (i)  च्या व्याख्येनुसार सिद्ध होत असल्याचे दिसून येत नसणे, तक्रारीत केलेल्या आरोपात सकृतदर्शनी काहीही तत्थ्य आढळून येत नाही व त्यामुळे तक्रारीत नमूद केलेले आरोपी किरीट सोमय्या यांचे विरोधात समन्स जारी करण्याचे काही कारण नाही. असे निष्कर्ष जारी करीत तक्रारदार अतुल लोंढे यांनी दाखल केलेली तक्रार याचिका खारीज करण्यात येत असल्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत.

मा. न्यायालयाच्या निर्णयामुळे वैयक्तीक किंवा आर्थिक हितसंबंध जपून कुणाच्या तरी हातातील बाहुला होण्यासाठी अतुल लोंढे यांनी हे बालिश कृत्य केले असल्याचे आज स्पष्ट झाले असल्याचा घणाघात भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.