वसंत मोरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत यावं; प्रशांत जगताप यांची खुली ऑफर

पुणे – मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला.

दरम्यान, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे(Vasant More) यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केलं असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं. अखेर त्यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, मोरे यांना पदमुक्त केल्यानंतर आता त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. मोरे यांना गळाला लावण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.शहराध्यक्ष प्रशांत जगताप (prashant jagtap) यांनी तर मोरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना जाहीरपणे पक्षात येण्याचं निमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी आणि शिवसेना वसंत मोरेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. आता शेवटी वसंत मोरे यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.