औरंगजेबावरुन वाद निर्माण करणारे त्याच्याच दरबारात नोकऱ्या करायचे, प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी (१७ जून) औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीला भेट दिली. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केले आणि मस्तक टेकवले.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पासून २४ किमी अंतरावर खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. येथे येऊन प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘औरंगजेबाने भारतावर ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. तुम्ही ही वस्तुस्थिती पुसून टाकू शकता का? शिवी द्यायची असेल तर जयचंदला द्या, औरंगजेबाला का? जयचंदमुळे बाह्य शक्ती प्रबळ झाल्या. यात औरंगजेबाचा काय दोष?’

यावेळी प्रसारमाध्यमांनी गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाचा मुद्दा उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीविषयी प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी प्रथम स्वत:चचे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारले.