राज्य शासन आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांच्या बळीची वाट पाहणार आहे?

कागल – गेली अडीच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.त्यामुळे त्यांच्यासह जनतेचीही कुचंबणा होत आहे . काही  कर्मचाऱ्यांनी अनिश्चित भवितव्याच्या भीतीने जीव गमावले आहेत.राज्य शासन आणखी किती कर्मचाऱ्यांच्या बळीची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी राज्य शासनाला केला. येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना साखर वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,एसटी सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी आहे. तर त्याची दोरी कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढून त्यांची व जनतेची होणारी कुचंबना दूर करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. राज्य शासनाने गत दोन वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना दिलेला कोणताही शब्द पाळला नाही. त्यामुळे विश्वासाहर्ता गमावलेल्या शासनावर एसटी कर्मचाऱ्यांचाही विश्वास राहिलेला नाही. या कर्मचाऱ्यांच्या सोबत आपण ठामपणे राहणार असून कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सरिता भानुसे, कृष्णात कोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहूचे संचालक यशवंत माने, राजे बॅंकेचे संचालक राजेंद्र जाधव, अनिल शेटे, पी आर पोलीस, अनिता माळी, सुनिता जाधव, आशा गोंधळी, नसीमा हकीम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. स्वागत संजय घाटगे  यांनी केले. संजय काळेबेरे यांनी आभार मानले.