झील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गरुड झेप, आपत्तीकाळासाठी उंचावरून बचाव करण्यासाठी यंत्रणा तयार

पुणे : जसेजसे नागरिकीकरण वाढत चालले आहे तशी तशी शहरे मोठी होत चालली आहेत आणि आजच्या शहरी वातावरणात अनेक लोक बहुमजली इमारतीत राहतात किंवा कामे करतात. मात्र वाढत्या शहरीकरणा बरोबरच त्याच्या सोबत वाढणाऱ्या समस्या देखील वाढत आहेत. आग लागणे , शॉर्ट सर्किट ,पूरपरिस्थिती तसेच दहशतवादी हल्ला अशा आपत्कालीन परिस्थिती मध्ये लिफ्ट वापरणे धोकादायक असू शकते तसेच जिने किंवा इतर आपत्कालीन पर्याय आग किंवा धुराने बंद होऊ शकतात.

वर्ल्ड ट्रेंड सेंटर (११ सप्टेंबर २०११) मध्ये झालेला दहशतवादी हल्ला असो अथवा सुरत मध्ये कोचिंग क्लास (२४ मे २०१९) मध्ये लागलेली आग असो अथवा पुण्याच्या लसनिर्मितीत आघाडीवर असणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट (२२ जानेवारी २०२१) मध्ये लागलेली आग असो अथवा भंडाऱ्यामध्ये आय.सी.यु (२३ एप्रिल २०२१) मध्ये शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीच्या घटना असो प्रत्येक वेळी अपरिमित अशी जीवितहानी झालेली आहे. अगदी काल पर्वा गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई मध्ये इमारतीत लागलेल्या आगीमुळे जिवाच्या भीतीने इमारतीतून नागरिकांनी उडी मारलेली बातमी देखील आपण वाचली असेल.

अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांकडून आपत्तीकाळासाठी (आणीबाणीच्या वेळेसाठी) नागरिकांना उंचीवरून खाली उतरवण्यासाठी बचाव यंत्रणा तयार करण्यात आली आहे. झील मध्ये चालू असलेल्या काही नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हि जीवन रक्षक प्रणाली आहे असे या प्रकल्पांवर काम केलेल्या प्राध्यापकांनी सांगितले. साधारणतः शंभर मीटर अर्थात तीस मजल्यांपर्यंत या बचाव यंत्रणेचा वापर करण्यात येऊ शकतो आणि १६० किलोग्रॅम पर्यंत वजन आणि ०.८ मी/से ते २ मी/से या वेगाने नागरिकांची आपत्तीकाळात सुटका करता येऊ शकते.

हि यंत्रणा फक्त नागरी भागासाठी न वापरता व्यावसायिक वापराच्या इमारती , औद्योगिक इमारती आणि खाण कामगारांसाठी देखील वापरता येऊ शकते. संपूर्ण यंत्रणा हि फक्त १२ किलोग्रॅम वजनाची असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिक ते पाठीवर सेफ्टी हार्नेसच्या मदतीने खिडकी ,संरक्षक जाळ्या यांना जोडून उंचीवरून सुरक्षितरित्या खाली उतरू शकतात. हि यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी अतिशय सोपी असून एखाद्या बॅगेप्रमाणे पाठीवर अडकवता येऊ शकते अथवा एक जागे वरून दुसरीकडे नेता येऊ शकते. उंचीवरून उतरताना वापरकर्त्याने एक हुक खिडकी अथवा सरंक्षक जाळी ला अडकवून खाली उतरण्यास सुरु करणे अपेक्षित आहे. उंचीवरून उतरण्यासाठी स्वयंचलित सेंट्रिफ्युगल ब्रेक यंत्रणेचा वापर करण्यात आला असून अशा प्रकारचा हा स्वदेशी प्रकारातील पहिलीच यंत्रणा आहे. हि यंत्रणा नमुना स्वरूपात असून संपूर्ण यंत्रणेचे सध्याचे वजन (१२ किलोग्रॅम) आणि किंमत (५५ हजार) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यास कमी करण्याचे नियोजन आहे असे यंत्रणेवर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी सांगितले.

झील एज्युकेशन सोसाटीचे सचिव प्रा. जयेश काटकर , अकॅडेमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर प्रा.उद्धव शिंद तसेच झील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ. अजित काटे यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या प्रा. अयुब तांबोळी , प्रा. सचिन गोडसे , प्रा. सचिन बोराडे या प्राध्यापकांनी तर सुशील कांबळे , रितेश गवळी, सिद्दीकी शेख, मधुरा महाजन आणि राज देशपांडे या विद्यार्थ्यांनी बचाव यंत्रणेची कल्पना प्रत्यक्षात उतरवली.

संपूर्ण संशोधनाकरिता झील एज्युकेशन सोसायटीकडून प्राध्यापकांना व विद्यार्थ्यंना सर्व सुविधा आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण यंत्रणेचे डिजाईन ,उत्पादन आणि टेस्टिंग झील कॉलेज मध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित वातावरणात करण्यात आल्याचे संशोधन प्रमुख प्रा. अयुब तांबोळी यांनी सांगितले. सदर यंत्रणेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना वा नागरिकांना हवे असल्यास झील एज्युकेशन सोसायटीच्या नऱ्हे संकुलातील झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.