तामलवाडी टोल नाक्याजवळ तिहेरी अपघात, एसटी चालक-वाहकासह आठ प्रवासी जखमी 

तुळजापूर  : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तामलवाडी टोल नाक्याजवळ कंटेनर एसटी बस व कारचा तिहेरी अपघात झाला असून या अपघातात आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्याजवळ बुधवार दिनांक 14 रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या कंटेनर क्रमांक (एनएल 01 एडी 2086) च्या चालकाने अचानक कंटेनरचा वेग कमी केल्याने पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगारातील बस क्रमांक (एमएच 40 एएन 9928) या एसटी बस ने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. तर एसटी च्या पाठीमागून येणाऱ्या फॉर्च्यूनर  क्रमांक (एमएच 25 एएल 3222) या पांढऱ्या कारने एसटीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या तिहेरी अपघातामध्ये एसटी चालक वाहकासह आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघात होताच कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला असून उस्मानाबाद-सोलापूर या एसटीमधील चालक अरुण अमर शिंदे, वाहक शोभा संजय दंगेकर यांच्यासह एसटी बस मधील सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. तर सुदैवाने फॉर्च्यूनर मधील एअर बॅग उघडल्याने दोघांना किरकोळ ईजा वगळता मोठी जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांच्यासह आयआरबी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले व वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत तामलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर एसटीमधून 28 प्रवासी सोलापूरला जात होते. त्यातील जखमींची नावे समजू शकली नाहीत.

 हॉटेल चालकांना आयआरबीच्या नोटीसा

रस्त्यावर कुठेही अपघात होऊ नये म्हणून आयआरबीचे कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत असतात. मात्र, हायवे शेजारील हॉटेल चालक हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्थित सुविधा देत नाहीत. परिणामी गाडी चालक हे रस्त्याच्या कडेला गाडी उभा करून हॉटेलमध्ये थांबतात. यामुळे बहुतांश अपघाताची शक्यता निर्माण होत असते. संभाव्य धोका ओळखून आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी हायवे शेजारील हॉटेल चालकांना पार्किंग व्यवस्थेबद्दल नोटीसा बजावल्या आहेत.