पंधरा वर्षाच्या बालिकेचा बाल संरक्षण समितीने बुलढाण्यातील बालविवाह रोखला

 बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पातुर्डा येथील एका पंधरा वर्षाच्या बालिकेचा बाल विवाह (child marriage ) रोखण्यात आला. अत्यंत नाट्यपूर्ण घडलेल्या या घडामोडीत गाव बाल संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्या बालिकेच्या आर्त हाकेला, वेळीच साद दिल्याने हे घडू शकले. आपल्या लग्नाच्या विरोधात एका बालिकेने  पोलिसांकडे तक्रार दिली. बालविवाह होत असल्याबद्दल या बालिकेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिस बीट हवालदारांनी गाव बाल संरक्षण समितीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर येथे  सुरू असलेल्या बाल संरक्षण समितीच्या प्रशिक्षणात महिला तक्रार निवारण समिती सदस्य आणि ग्राम बाल संरक्षण समिती सचिव म्हणून काम करणाऱ्या श्रीमती बोपले सहभागी झाल्या होत्या. बीट हवालदाराकडून त्यांना बालविवाह होत असून बालविवाह रोखण्यासाठी सदर वधू असलेल्या बालिकेने तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी बोपले यांना दिली. प्रशिक्षणातून बाहेर पडताच क्षणाचाही विलंब न लावता बोपले यांनी ताबडतोब बाल संरक्षण समितीच्या भूमिकेनुसार काम करीत लग्नमंडपात धाव घेतली. या बाल विवाह शेकडो लोक उपस्थित होते लग्नाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांना समज देत हे लग्न कायदेशीर नसून गाव बाल संरक्षण समिती या विवाहाला प्रतिबंध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कायदेशीर कार्यवाहीची सूचनाही दिली. यावेळी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र वाघ यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. यानंतर संबंधितांकडून लेखी हमी पत्र आणि जबाब नोंदविण्यात आले तसेच बालिकेला बाल कल्याण समिती समोर हजर राहून पुढील प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या. श्रीमती बोपले आणि शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने एका पंधरा वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह वेळीच रोखता आला. विवाह रोखल्या नंतर मुलीच्या चेहर्‍यावर सुटकेचा आनंद दिसत होता.

या संदर्भात बोलताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “अजूनही समाजात होणारे बालविवाह ही खूप मोठी समस्या आहे. पालकांनी आपल्या लहान मुला-मुलींचे विवाह योग्य वयापूर्वी लावून देणे केवळ चूक नसून तो गुन्हा आहे. पालकांचे समुपदेशन करण्यासाठी शासकीय स्तरावर अधिक प्रयत्न केले जातील बालविवाह मागील मूळ समस्या सोडवण्यावर ही भर दिला जाईल. मात्र कोणीही आपल्या कोवळ्या जीवांना लग्नाच्या बेडीत अडकवून त्यांचं शारीरिक आणि मानसिक नुकसान करू नये,” असं आवाहनही यावेळी ॲड. ठाकूर यांनी केले. तसेच विवाह रोखणाऱ्या बाल संरक्षण समिती आणि पोलीस तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.