महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवारसाहेब आहेत हे लक्षात ठेवा; जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांना खडसावले

मुंबई – पत्राचाळ प्रकरणात माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. चार – आठ – दहा दिवसात म्हणजे जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणार्‍यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्यसरकारने जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारला दिले.

ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळचे इतिवृत्त ज्या अधिकार्‍याने सही केली ते माध्यमांना देत असून त्यानंतर जे कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे त्याच्यात माझे नाव आहे असे माध्यमातून बोलले जात आहे त्या आरोपपत्रात नक्की काय आहे ते त्यांच्या पान नंबर सातवर आणि आठवर असेल त्याची कॉपी तुम्हाला दिली आहे. म्हणजे जी चौकशी करणारी एजन्सी आहे ती कोर्टात काय मांडते आणि राज्यसरकारची त्यावेळी जी चर्चा झाली त्याची टिप्पणी ते काय म्हणतात त्या दोन्ही कॉपी याची स्वच्छ भूमिका सांगितली आहे असेही शरद पवार म्हणाले.

यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पत्राचाळ प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त गृहनिर्माणचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या सहीचे पत्रासहीत माध्यमांसमोर ठेवले. बैठका घेऊन मध्यममार्ग काढणं, संवाद साधणं चुकीचं आहे का असा सवाल करतानाच वेगवेगळ्या बैठकांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

याप्रकरणी चौकशी करा आमचा विरोध नाही मात्र पराचा कावळा करु नका. मी १९९० पासून आजपर्यंतचा साक्षीदार आहे. आपण हत्तीच्या मर्मस्थळावर घाव घातल्यावर हत्ती उसळतो असं समाजाचं मत आहे. महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवारसाहेब आहेत हे लक्षात ठेवा असे ठणकावून जितेंद्र आव्हाड यांनी आरोपकर्त्यांना सांगितले.

जी कागदपत्रे सादर केली त्यात चौकशी करणार्‍या एजन्सीने काय म्हटले आहे त्याचे वाचन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. पवारसाहेबांना बदनाम करण्याचा डाव आहे. आम्ही बेछूट आरोप करत नाही. जी पक्षाची आणि पवारसाहेबांची भूमिका आहे ती देशाला आणि राज्याला माहित आहे. तुम्ही आरोप केलाय ना भाजपचे अध्यक्षही काहीतरी म्हणाले आहेत. ताबडतोब चौकशी करा. अहवाल घ्या आणि हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर संबंधितावर काय कारवाई करणार हे जाहीर करा अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.