शतकाला शतकी उत्तर! विराटचे शतक अन् आरसीबीने बिघडवला मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा खेळ

हैदराबाद- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (SRHvsRCB) झालेल्या आयपीएल २०२३ मधील (IPL 2023) ६५व्या सामन्यात शतकी तडका पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून यष्टीरक्षक हेनरी क्लासेन याने ५१ चेंडूत शतक (१०४ धावा) झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने १८६ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात बेंगलोरकडून रनमशीन विराट कोहलीने शानदार शतकी (Virat Kohli Century) करत १९.२ षटकातच संघाला सामना जिंकून दिला. बेंगलोरने ८ विकेट्सने हा सामना जिंकला.

या विजयासह बेंगलोरने गुणतालिकेत उडी घेतली (IPL Playoffs) आहे. बेंलगोरने हैदराबादविरुद्धचा सामना जिंकून आपली गुणसंख्या १४ केली आहे. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाचव्या स्थानावर ढकलले. बेंगलोरला आपले प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी गुजरात टायटन्सविरूद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. तर मुंबईलाही त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकावा लागेल.