छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रवादी राज्यात साजरा करणार…

मुंबई – महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP state president and former water resources minister Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बुथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या करुन त्या विभागस्तरावर पूर्ण कराव्यात अशी चर्चा झाली. शिबिरे आयोजित करून त्या शिबिराला आदरणीय शरद पवारसाहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत. बुथ कमिट्यांची विभागस्तरावर काही नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये सूरू असलेल्या प्रथेचा गैरसमज करण्यात आला आहे. वर्षानुवर्ष तिथे परंपरा चालू आहे. मात्र यासाठी तात्काळ एसआयटी स्थापन करण्यात आली याबाबत आश्चर्य जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

लोकसभा आणि विधानसभेचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाहीं. कोणतेही सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे बाहेर सांगण्याचा विषय येत नाही. कोणत्याही लोकसभा मतदारसंघाबाबत आमची चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीची बैठक झाली त्याबाबतची माहिती आम्ही अगोदरच दिली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आमच्या तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना प्रश्न चॅनल्सकडून विचारले जातात आणि त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा सर्व प्रश्नांना उत्तर टाळणं हे महत्वाचे आहे असेदेखील बैठकीत ठरवण्यात आले आहे.

६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे एक भारतवर्षातील स्वाभिमानी राज्य निर्माण करण्याचा प्रसंग होता आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

१० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला २४ वर्षे पूर्ण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करुन हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.