वडगाव बाजार समिती निवडणूक : शाहू शेतकरी आघाडीचा नरंदे येथून झाला प्रचार शुभारंभ

कोल्हापूर –  वडगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ नागोबा देवालय, नरंदे येथून आज झाला. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, युवा नेते विश्र्वेश कोरे यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.  महादेवराव महाडिक,  विनय कोरे,  प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर,  राजू शेट्टी, सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर अशा सहकारातील अनुभवी नेत्यांनी एकत्रित येत या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून मोट बांधली आहे.

शेतकरी केंद्रबिंदू मानून आजपर्यंत वडगांव बाजार समितीचे कामकाज केल्यामुळेच आज समितीची उलाढाल 100 कोटीच्या वर गेली आहे. हा आलेख असाच चढता ठेवण्यासाठी सर्व मतदार बंधू-भगिनींनी कपबशी चिन्हावर शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे  असे आवाहन यावेळी माजी आमदार मा. अमल महाडिक यांनी केले. तसेच  प्रचार शुभरंभाला झालेली गर्दी पाहता आजच राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे असे मत मा.राहुल आवाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी जि.प.स. अरुण इंगवले, जि.प.स. अशोक माने, जवाहर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले, जि.प.स. प्रसाद खोबरे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, विलास खानविलकर, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, संदीप कारंडे, माजी जि.प.स. अरुण पाटील, शरद कारखान्याचे संचालक डी.बी.पिष्ठे, शरद कारखान्याचे संचालक अभिजित भंडारे, शिवाजी पाटील, शहाजी बापू पाटील, राजवर्धन मोहिते, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील ताकदवान नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणावर निश्चितपणे प्रभाव टाकणारी ठरणार आहे.