बाळ दत्तक घ्यायचे आहे …? जाणून घ्या कायदेशीर बाबी

पुणे – आपल्या कुशीत बाळाने खेळावे हे प्रत्येक आई-वडीलांचे स्वप्न असते, पण काही कारणाने अनेकांच्या जीवनातील हे स्वप्न पूर्ण होण्यास अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून पूर्वी जवळच्या नातेवाईकाचे अथवा परिचित व्यक्तीचे बाळ दत्तक घेतले जायचे व त्या बाळाला तितकेच प्रेम देण्याचा प्रयत्न आई व वडील करायचे. अनेकदा चुकीच्या हेतूनेदेखील बाळ दत्तक घेण्यात येत असे. अश्याप्रकारचे दत्तक ग्रहण प्रक्रिया या बरेचदा कागदोपत्री न करता प्रेमसंबंध आहे म्हणून टाळल्या जात असे किंवा स्टँपपेपरवर लिहून केल्या जात असे. या सर्व गैरकायदेशीर बाबीं घडू नये व दत्तक प्रक्रियेवर कायद्याचे नियंत्रण राहून दत्तक बालकास सर्व कायदेशीर हक्क प्राप्त व्हावे तसेच त्याचे पोषण करण्यास मानिसिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम पालक मिळून त्यांचेकडून जबाबदारीपुर्वक बालकाचा सर्वांगीन विकास घडावा, यासाठी शासनाने दत्तक विधान पारित केले आहे.
दत्तक कायद्यामुळे निराधार मुलांना आधार मिळून त्यांच्या संगोपनाची सामाजिक जबाबदारी पार पाडल्या जाते तसेच पालकांना कायद्यानुसार हक्काचे मुल प्राप्त होते. शिवाय दत्तक संकल्पनेमुळे कुटुंबे मर्यादित राहून त्यायोगे लोकसंख्यावाढीला आळा बसतो. तर जाणून घेवू या दत्तक प्रक्रियेतील महत्वाच्या कायदेशीर बाबी.

काय आहे दत्तक विधान :

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत स्थापित केलेल्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण(CARA) तर्फे बाळ दत्तक घेण्याच्या सर्व कायदेशीर बाबीवर नियंत्रण ठेवण्यात येते. तसेच बालक दत्तक घेण्याची प्रक्रिया फक्त केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण(CARA) मार्गदर्शिका 2017, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 प्रमाणे दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते.
या पक्रियेत मुल आपल्या जैविक पालकाकडील आपले सर्व हक्क, विशेष अधिकार आणि जबाबदाऱ्यांपासून कायमचे विभक्त केले जाऊन दत्तक घेणाऱ्या पालकाचे कायदेशीर मुल होते. त्यास दत्तक विधान म्हणतात.
जाणून घेऊ दत्तक विधान प्रक्रिया –

1. दत्तक घेणे-

• अनाथ सोडून दिलेल्या किंवा शिशुगृहातील ताब्यात दिलेल्या बालकांच्या कुटुंबाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा अधिनियम व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या आणि दत्तक विधान नियंत्रण नियमांच्या अधीन राहून दत्तक विधानाची कार्यवाही होईल.
• कोणत्याही धर्माच्या एका व्यक्तीचे मुल दुसऱ्या नातेवाईकांनी दत्तक घेण्याची कार्यवाही या अधिनियमातील तरतुदी आणि दत्तक विधान नियंत्रण नियमानुसार होईल.
• या अधिनियमातील तरतुदी हिंदू दत्तक आणि निर्वाह अधिनियम 1956 अन्वये झालेल्या बालकांच्या दत्तक विधानास लागू होणार नाहीत.
• देशांतर्गत झालेल्या सर्व दत्तकविधानास या अधिनियमातील तरतुदी आणि दत्तक विधान नियंत्रण नियमावली लागू होईल.
• कोणतीही व्यक्ती जी न्यायालयाच्या आवश्यक आदेशाशिवाय परदेशातून बालकास आनेल किंवा बालकास परदेशात पाठविले किंवा परदेशातील व्यक्तीकडे बालकाचे संगोपन व ताबा सोपविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. ती व्यक्ती या अधिनियमाच्या कलम 80 अन्वये शिक्षेस पात्र ठरेल.

२) बाल दत्तक घेण्यासाठी नियम व अटी –

• भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय नागरिक किंवा परदेशी नागरिक भारतात जन्माला आलेले मुल दत्तक घेऊ शकते या तिन्ही साठी वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.
• मुल दत्तक घेणे यासाठी विवाहित असण्याची सक्ती नाही (मात्र एकल पुरुषास मुलगी दत्तक घेता येणार नाही.)
• स्त्री किंवा पुरुष कोणीही मुल दत्तक घेऊ शकते. जर एखादे जोडपे मुल दत्तक घेऊ इच्छित असेल तर त्यांच्या लग्नाला कमीत कमी दोन वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि दत्तक घेण्यासाठी दोघांचीही संमती घेणे आवश्यक आहे.
• बालक व दत्तक इच्छुक पालक यांच्या वयामध्ये कमीत कमी 25 वर्षे अंतर असणे आवश्यक आहे.
• दत्तक घेणाऱ्या व्यक्ती शारीरिक व मानसिकरित्या सामान्य स्थितीत असाव्यात. तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य असावे. बालक दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यापैकी कोणालाही गंभीर स्वरूपाचा आजार नसावा.
• दत्तक इच्छुक पालकांना 3 किंवा अधीक मुल असल्यास त्यांना दत्तक घेण्याची परवानगी नाही.
• एकल पालकत्व – एकल पालकत्वामध्ये स्त्री मुलगा किंवा मुलगी कोणालाही दत्तक घेऊ शकते परंतु पुरुष पालकाला मुलगी दत्तक घ्यायचा अधिकार नाही. यासोबत एकल पालक 55 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा अशीही अट आहे.
• दाम्पत्य जर एखादे मुल दत्तक घेत असेल तर त्यांच्या वयाची बेरीज 110 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.

४) दत्तक घेणाऱ्या प्रक्रियेतील महत्वाच्या पायऱ्या कोणत्या?

• सर्वप्रथम दत्तक इच्छुक पालकांनी त्यांचे नाव केंद्र शासनाचे www.cara.nic.in
या अधिकृत संकेत स्थळावर स्वतः किंवा मान्यताप्राप्त दत्तक संस्थेच्या मदतीने दत्तक घेण्यासाठी इच्छुक अशी नोंदणी करणे आवश्यक आहे व 30 दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
• भारतीय मान्यताप्राप्त दत्तक संस्थेत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्तक इच्छुक पालकांच्या घरी जाऊन त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करून केअरिंग या संकेत स्थळावर सदरील माहितीचा अहवाल अपलोड करतात याच सोबत पालकांनी मार्गदर्शनपर वर्गात जाऊन पालकत्वाची मानसिक तयारी करायची असते. नोंदणी केल्यानंतर 30 दिवसाच्या आत हा भाग पूर्ण करावा लागतो.
• दत्तक इच्छुक पालकांचा ऑनलाईन प्रतीक्षा यादी प्रमाणे नंबर लागल्यास दत्तक मुक्त असलेले बाळ केअरिंग या संकेत स्थळावर बघावयास मिळते. बाळ बघावयास मिळालेल्या तारखेपासून 48 तासाच्या आत बालकास ऑनलाईन पद्धतीने पसंती कळवावी लागते.
• भारतीय मान्यताप्राप्त दत्तक संस्था दत्तक जाण्यासाठी तयार असलेल्या बालकास पसंती दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत मुलाची भेट इच्छुक पालकांशी करून देतात. या दरम्यान या मुलांसोबत काही वेळ देखील घालवण्याची परवानगी दिली जाते. दत्तक पात्र बालकाचे वैद्यकीय कागदपत्र इच्छुकांना अभ्यासासाठी दिले जातात.
• निवड केलेल्या बालकास दत्तक घेण्याची मानसिक तयारी झाल्यावर एक स्वीकृती अर्ज पालकांनी सही करावा लागतो.
• दत्तक इच्छुक पालकांनी विशेष दत्तक संस्थेमार्फत नायालयात बालक दत्तक मिळणेस अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच सदरील प्रकरण दाखल झाल्यानंतर किमान 2 महिन्यामध्ये सदरील अर्ज निकालात काढणे न्यायालयास बंधनकारक आहे.प्रकरण विहित मुदतीत निकाली न काढल्यास संयुक्तिक कारणे नमूद करणे अपेक्षित असते.
• प्रती पालकत्व किंवा तात्पुरत पालकत्व –
कोर्टाने परवानगी दिल्यावार मुलाला आणि पालकांना एकमेकांची सवय व्हावी आणि पालकांना मुलाच्या अंगभूत सवयी कळाव्यात यासाठी काही काळ बालकाचा ताबा पालकांना न्यायालयात बालाकासोबत हजर व्हावे लागते. न्यायाधीशांसमोर बंद खोलीत दत्तक घेण्याबद्दल सुनावणी होते. यावेळी काही प्रश्न पालकांना विचारले जातात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यायालयाकडून दत्तक ऑर्डर दिली जाते. परंतु पुढची दोन वर्षे पाठपुरावा केला जातो.

५) कोणती आवश्यक कागदपत्रे आहे?

• कुटुंबाचा एकत्रित फोटो, पँन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, विभक्त असल्यास न्यायालयाचा निकाल, दोन व्यक्तींचे संदर्भ पत्र, जर 5 वर्षावरील मुल असेल तर त्याचे संमती पत्र

६) काय करू नये?

• अनाथ, सोडून दिलेल्या किंवा एखाद्या गरीब कुटुंबातील मुल काही मोबदला किंवा आश्वासन देऊन बाल दत्तक घेऊ नये.
• मुल स्टँम्प वर रजिस्टर किंवा नोटरी करून दत्तक घेऊ नये असे केल्यास बाल देणाऱ्या व घेणाऱ्या विरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 अन्वये गुन्हा दखल केल्या जाऊ शकतो.
• कुमारी मातेचे बाळ, अक्षम पालकाचे बाळ कुठेही टाकून न देता बाल कल्याण समितीशी संपर्क करून बाल कल्याण समितीला बाळ कायदेशीररित्या समर्पित करावे. याबाबत, बाळाच्या जैविक पालकाची माहिती गोपणीय ठेवल्या जाईल.
दत्तक विधानाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यवतमाळ दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ, येथे संपर्क साधावा.