नगरपंचायत निवडणूक निकाल काँग्रेससाठी समाधानकारक, जनतेने भाजपाला नाकारले- नाना पटोले

मुंबई : राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नगर पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजून दिला असून भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी ६०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या त्या आता ३०० वर खाली घसरल्या आहेत. आम्ही १७ नगरपंचायतीवरून २२ वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत व आमचे ४४ आहेत तरीही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. देशाचा व राज्याचा विकास करून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने जनतेने आमच्यावर विश्वास टाकला असून आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवू. भंडा-याचा निकाल अजून येत आहे, तिथेही काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील आणि सत्ता स्थापन करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता हे जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिले आहे. स्वबळावर निवडणूक लढवल्यामुळे पूर्वी आघाडीमुळे आम्ही जिथे निवडणुका लढवत नव्हतो तिथेही आता काँग्रेस संघटना वाढणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह पुन्हा गावागावांत पोहोचले असून आगामी काळातील निवडणुकांत याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेतील विजय हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि निष्ठेचे फळ असून या निवडणुकीत विजयासाठी कठोर परिश्रम घेणा-या सर्व कार्यकर्त्यांचे व विजयी उमेदवारांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अभिनंदन केले आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मतदारांचेही आभार मानले आहेत.

भारतीय जनता पक्ष व चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतना नाना पटोले म्हणाले की, भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यांचा दावाच हास्यास्पद आहे. मिस कॉल करून फसवून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजपा जगातील पहिला पक्ष आहे. जनता त्यांचा भूलथापांना बळी पडत नाही हेच नगरपंचायतीच्या निकालावरुन दिसून आले आहे.