आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करुन जनतेचे प्रश्न सोडवू – जयंत पाटील

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं… आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करु व जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज शिंदेसरकारच्या १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला असून या शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा त्यांचा चॉईस असतो मात्र बघणार्‍यांना ते मंत्रीमंडळ कसं दिसतं हा जनतेचा चॉईस आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहकारी निवडून आपली कामगिरी बजावली आहे आता जे सहकारी आहेत त्यांच्यात काय – काय अभाव आहे हे शोधायला लागेल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. कोणत्या प्रकारचे, कोणत्या पध्दतीचे, कोण बाहेर राहिले आणि कुणाच्या प्रचंड अपेक्षा असताना भ्रमनिरास झाला आहे याच्या कहाण्या येत्या आठ – दहा दिवसात समोर येतील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

३९ दिवसानंतर मंत्रीमंडळ अस्तित्वात आले आहे. मात्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे गोगलगायीच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मंत्रीमंडळ स्थापन केले आहात तर जनतेच्या प्रश्नाकडे आता सरकारने लक्ष द्यावे असे सांगतानाच विरोधाभास भाजपच करु शकते. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांनाच बरोबर घेऊन जाणं हे सोपं काम नाही ते आज पुन्हा एकदा करुन दाखवलं असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.