आयपीएल 2022 : Disney+ Hotstar च्या कमाईत 25% होणार वाढ 

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 15वा सीझन भारतात परतला आहे. यासोबतच यंदा या लीगमध्ये दोन नवे संघही सामील झाले आहेत, त्यामुळे या वर्षी स्पर्धेत आणखी सामने आयोजित केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत यंदा आयपीएल स्पर्धेतून जाहिरातींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

आयपीएल सामन्यांचे प्रसारण हक्क डिस्ने स्टार नेटवर्ककडे आहेत. टेलिव्हिजनवरील आयपीएल सामने नेटवर्कच्या स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर प्रसारित केले जातात. Disney+ Hotstar हे त्याचे अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार आहे. दरम्यान, दुपारच्या सामन्यांपेक्षा संध्याकाळचे सामने जास्त लोक पाहतात. अशा परिस्थितीत यावेळी जाहिरातीचे दरही जास्त असतात.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात दुपारी 3.30 च्या स्लॉटमध्ये 12 सामने होणार आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 11 होती. उर्वरित सामने सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवले जातील. 26 मार्चपासून आयपीएलचा हंगाम सुरू होत असून तो 65 दिवस चालणार आहे. यादरम्यान 10 संघ एकूण 70 लीग सामने आणि चार प्लेऑफ सामने खेळतील.अधिक सामन्यांसह, टीव्ही जाहिरातीचे दर 15 लाख रुपये प्रति 10 सेकंद स्लॉटवर गेले आहेत, जे गेल्या वर्षी प्रति 10 सेकंद स्लॉट 14 लाख रुपये होते. गेल्या वर्षी टीव्हीवर (IPL जाहिरात महसूल) 3,000 कोटी रुपये आणि डिजिटलवर 400-500 कोटी रुपये होते. मात्र, यंदा महसूल सुमारे 4,300 कोटी रुपये अपेक्षित आहे.