काकांच्या ‘त्या’ चुकीमुळे अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही ? दादांची खदखद पुन्हा आली बाहेर!

मुंबई  : 2004 साली आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी दवडल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांनी बोलून दाखवली आहे.  यामुळे शरद पवारांना अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असून 2004 मध्ये मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणं, ही सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. इतकच नव्हे तर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, तर सत्तेत आम्हीच राहिलो असतो, असंही अजित पवार लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

नेमकं काय झालं होतं  2004साली ?

2004 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या, पण तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं. राष्ट्रवादीला 71, काँग्रेसला 69, शिवसेनेला 62 आणि भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, याबदल्यात राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती मिळाली.  सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे अजित पवारच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नव्हतं.