एलआयसीचा आयपीओ कधी येणार ? समोर आली ‘ही’ मोठी माहिती

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा IPO मार्चपर्यंत येईल अशी माहिती समोर आली आहे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, एलआयसीचा आयपीओ मार्चपर्यंत येईल आणि त्याच्या मंजुरीसाठी जानेवारीच्या अखेरीस मसुदा पेपर बाजार नियामक सेबीकडे सादर केला जाईल.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सध्या जुलै-सप्टेंबर 2021 च्या तिमाहीसाठी LIC चा आर्थिक डेटा अंतिम केला जात आहे. याशिवाय निधी विभाजनाची प्रक्रियाही सुरू आहे. आम्ही या महिन्याच्या अखेरीस सेबीकडे आयपीओशी संबंधित ड्राफ्ट पेपर सादर करण्याची अपेक्षा करतो. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलआयसीचा आयपीओ येईल हे निश्चित आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एलआयसीचा आयपीओ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारने या आर्थिक वर्षात आतापर्यंत अनेक PSUs च्या निर्गुंतवणुकीतून केवळ 9,330 कोटी रुपये उभे केले आहेत.

सरकारी मालकीची LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी सरकारने गेल्या सप्टेंबरमध्ये 10 मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली होती. यामध्ये गोल्डमन सॅक्स, सिटीग्रुप आणि नोमुरा यांचा समावेश आहे. तर सिरिल अमरचंद मंगलदास यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.यापूर्वीच्या बातम्या आल्या होत्या की सरकार LIC साठी 15 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन शोधत आहे.

सरकारच्या प्रस्तावित गणनेशी गुंतवणूकदार सहमत असल्यास, LIC सुमारे 15 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनासह भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या लीगमध्ये सामील होईल.सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या अनुक्रमे रु. 17 लाख कोटी आणि रु. 14.3 लाख कोटींच्या बाजारमूल्यांसह भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. एलआयसीचे अंदाजे मूल्य निश्चित करण्याचा अंतिम अहवाल अजून येणे बाकी आहे.