याकूबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा डाव ?

दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारने त्यांच्या कुटुंबियांना का दिला ? : अतुल लोंढे

मुंबई -भारतीय जनता पक्षाकडे देशातील मुख्य प्रश्नांवर उत्तर नसल्याने जाणीवपूर्वक धार्मिक मुद्द्यांना महत्व दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. परंतु २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारनेच त्यांच्या कुटुंबियांना दिला व त्याचा अत्यंसंस्कार झाल्याचे सर्वांनी पाहिले. अतिरेक्याचा मृतदेह भाजपाने त्यांच्या कुटुंबियांना का दिला? याचे उत्तर भाजपाने द्यावे, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.(Why did the BJP government give the body of terrorist Yakub Memon to his family? : Atul Londhe)

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबीयांना देता येत नाही. काँग्रेस सरकारने दहशतवादी अफजल गुरू आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी दफन केले. अतिरेक्यांचे समाजात उदात्तीकरण होऊ नये म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली होती. भाजपाच्या सरकारने मात्र २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना दिला. भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा व वरूण गांधी यांनी याकूब मेमनला फाशी देऊ नये म्हणून पत्रही लिहिले होते. यावर भाजपा माफी मागणार का ? तसेच ज्यावेळी मृतदेह दफन केला जातो त्याच्या तीन वर्षानंतर त्याठिकाणी दफन केलेल्या ठिकाणी नागर वखर करण्यात येते, ती कबर खोदली जाते. माञ असे झाले नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे झाले आहे याचे उत्तर भाजपने द्यावे.

भाजपा सरकारने मात्र कुख्यात दहशतावादी मसूद अजहर याला सरकारी सुरक्षेत अफगाणिस्तानात सोडून देण्यात आले होते. संसदेवर हल्लाही भाजपा सरकारच्या काळात झाला होता. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेला भारतात तपासासाठी येण्याचे निमंत्रण भाजपा सरकारनेच दिले होते. भाजपाने दहशवादाबद्दल बोलणे हेच मुळात हास्यास्पद आहे, असेही लोंढे म्हणाले.