महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे; सुप्रिया सुळे यांची खोचक मागणी 

'आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही तर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी हा पर्याय निवडला'

मुंबई  – राज्यात गणपती आणि अनेक सण होत राहतील, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप व्हॉटस्ॲप मेसेजवरून मिळाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी बोट ठेवले. घाटकोपर येथे गणपती दर्शन घेत असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.(Maharashtra needs two Chief Ministers; Demand of Supriya Sule)

प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते पण दुर्दैव आहे, आजचे जे महाराष्ट्रातील सरकार आहे. ज्या पद्धतीने ओरबाडून… दडपशाही करून… ईडी वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून, काय ते ५० खोके कानावर ऐकायला मिळते… हे दुर्दैवी आहे अशी खंत खासदार सुळे यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी जे लोक राजकारण व समाजकारणात आले आहेत त्यांना हा काळ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही तर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी हा पर्याय निवडला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आमच्यासारख्या लोकांना फार अस्वस्थ करणारी पध्दत पैसा, सत्ता, ईडी या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सत्ता ओरबाडून घेतल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून खरंतर सर्वसामान्यांची सेवा करण्याची अपेक्षा होती. मात्र मागच्या अडीच महिन्यात या सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्याचे दिसत नाही असा जोरदार हल्लाबोलही  सुळे यांनी शिंदे सरकारवर केला.

राज्यात अडीच महिन्यापासून कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी नवीन सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ मागितला असता त्यांच्याकडून वेळ मिळत नाही असा आरोपही सुळे यांनी यावेळी केला.

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक देश एक पक्ष असे वक्तव्य केले होते पण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत. संविधानावर माझा विश्वास असल्याने एक देश, अनेक पक्ष, असे विचार असल्याचे सांगून भाजप नेत्यांचे शिवाय निर्मला सीतारामण यांचेही स्वागत बारामतीत करत असल्याचे सांगितले. तेथे अनेक संस्था, शाळा खूप चांगले काम करतात, निर्मलाजींना वेळ असेल तर स्वतः त्यांना हे काम दाखवेन, असेही  सुळे म्हणाल्या.

आपल्या देशात लोकशाही ही खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक पक्षाला त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, असे मत व्यक्त करताना सध्या आयटी, ईडी या केंद्रीय यंत्रणांचा वापर हा राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी होत आहे. हे एक नवीन नॉर्मल देशात सुरू झाले आहे. जे लोक आपला पक्ष सोडून भाजपमध्ये गेले त्यांची चौकशी थांबते, असे विधान भाजपचेच लोकप्रतिनिधी करतात. त्यामुळे वास्तव या देशाला दिसत असल्याचे  सुळे म्हणाल्या.

खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आहे. सर्वसामान्य माणसाला अडचणी येतात तेव्हा पदयात्रा करावी लागते. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागत करतानाच खासदार सुळे यांनी पदयात्रेसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.