कॉंग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर 

पणजी – गोव्यात काँग्रेसला ( Goa congress ) मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दिगंबर कामत ( Digambar Kamat ) हे भारतीय जनता पक्षात ( BJP ) प्रवेश करू शकतात असं सांगितले जात आहे. त्यांना ऊर्जामंत्री बनवलं जाऊ शकते.असं सांगण्यात येत आहे.

कामत यांना विश्‍वासात न घेता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधिमंडळ आणि प्रदेश काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची निवड केली आहे. कामत यांना डावलून माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar ) यांना दिल्लीला बोलवून घेण्यात आले. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव ( Dinesh Gundurao) व चोडणकर यांनी परस्पर गोव्याच्या नेतृत्वबदलाचा आलेख लिहिला. या प्रकारामुळे कामत कमालीचे नाराज व अस्वस्थ आहेत.

दोन दिवसांपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या एका गटापुढे बोलताना कामत यांनी आपल्याला डावलल्याची भावना व्यक्त केली होती. कामत यांनी आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांना नाराजीची कल्पना दिली आहे. ज्या पक्षात मान नाही त्या पक्षात तुम्ही राहू नका, असा सल्ला त्यांना कार्यकर्त्यांनी दिला.गोव्यात जवळपास १० वर्ष काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे. या काळात कामत ३ वर्ष विरोधी पक्षनेते होते. कामत हे गोव्यातील काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जातात. २००५ मध्ये ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. २००७ मध्ये ते गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते.