बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉल महत्त्वपूर्ण ठरेल  – देवेंद्र फडणवीस

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉलचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केले.

बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉल महत्त्वपूर्ण ठरेल असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चहा स्टॉल वितरण सोहळा दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात पार पडला. माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, मुंबई उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, सचिव प्रतिक करपे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉलच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत ५० शाखा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांनी सांगितले. यावेळी योगिता मोरे, माधुरी ठाणेकर, अमिता देवळेकर, संगीता पुसळकर, मालती मोरे, सुशील शिरोडकर यांना चहा स्टॉलचे वितरण करण्यात आले.