ही गद्दारी राजकारणाशी किंवा उद्धव साहेबांशी नाही, तर माणुसकीशी झाली : आदित्य ठाकरे

नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या उठवानंतर आता शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दिवसेंदिवस शिवसेनेतून अनेकजण शिंदे गटात सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर उरलेली शिवसेना (Shiv Sena) वाचवण्यासाठी ठाकरे पितापुत्रांची धडपड सुरु झाली आहे. कित्येक वर्ष शिवसैनिकांना न भेटणारे ठाकरे पितापुत्र आता पक्ष हातातून जाईल या भीतीने ठिकठिकाणी मेळावे घेत असल्याचे दिसत आहे.यातच आज शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी  यांनी विरोधी पक्ष संपवण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही, पण आमच्या जवळचे लोक आम्हाला संपवू पाहत होते, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. देशभरात जगभरात उद्धव साहेबांच कौतुक होत होतं. मुख्यमंत्री चांगलं काम करत असेल, चांगला माणूस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला खुर्चीवरून उतरवण्याचा मानस का असेल? या ४० जणांना का वाटलं? यांच्यासाठी आपण काय नाही केलं? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

उद्धव साहेबांची शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा हे यांचं हे सगळं सुरू होतं. उद्धव साहेबांनी काम सोडलं नव्हतं, काम सुरूच होतं, पण भेटता येत नव्हतं हे खरं आहे. ४० गद्दारांना कळलं उद्धव साहेबांवर शस्त्रक्रिया झाली आहे, तेव्हा यांनी गद्दारी केली, आमदारांची जमवा जमव करत होते. गद्दारी करायला महाराष्ट्रात हिम्मत नव्हती, गद्दारी करायला सुरुत, गुवाहाटी, गोव्यात गेले. आसाम मध्ये पूर आला होता, तिथे या गद्दारांची मजा सुरू होती. ही गद्दारी राजकारणाशी, किंवा उद्धव साहेबांशी नाही झाली, ही माणुसकीशी गद्दारी झाली, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.