एकनाथ शिंदे सुरक्षा प्रकरण : सुहास कांदेंचे आरोप गंभीर; भाजपने केली चौकशीची मागणी 

Pune –  शिवसेनेत एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली. तरीही त्यांना झेडप्लस सुरक्षा दिली नाही. गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं शिंदेंना सुरक्षा देऊ नका. हा काय प्रकार आहे असं म्हणत कांदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजयुमोचे देखील आक्रमक झाली असून युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, कुख्यात नक्षलवादी मिलींद तेलतुंबडे व अन्य नक्षलवाद्यांचा एनकाउंटर झाल्यानंतर धमकीचे पत्र व इंटेलिजेंस रिपोर्ट असूनही गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नये असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना दिल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.

या आरोपाची पुष्टी शंभूराजे देसाई यांनीही केली आहे. मिलिंद तेलतुंबडे नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर व CPI (Maoist) या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी मेंबर होता तसेच एल्गार परिषद खटल्यातील आरोपी होता, हे सर्व आरोप गंभीर आहेत यांची सखोल चौकशी व्हावी! असं गावडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.