सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीबाबत आपचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

पुणे –  शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता )  वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपुलाचे (Flyover Bridge) काम सुरू झाले आहे.हा पूल निर्माणाधिन (Under construction) असून पुलाची लांबी अडीच कि.मी. असणार आहे. त्यानुसार, दोन टप्प्यांत हा पूल उभारण्यात येणार आहे.

पुलाचे काम सुरू झाल्यानंतर आता सिंहगड रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रंचड मोठ्या वाहतुक कोंडीचा (Traffic jam) सामना करावा लागत आहे.माणिकबाग ते आनंदनगरपर्यंत असणारा रस्ता हा पुलाच्या कामामुळे अरुंद (Narrow) झाला आहे यामुळे आता सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळेला प्रचंड मोठी वाहतूककोंडी होत आहे याचा नागरिक, अबाल-वृद्धांना तसेच रुग्णांना त्रास होत आहे. याची खबरदारी म्हणून काम सुरू करण्याआधीच वाहतूक व्यवस्थेत योग्य ते बदल करून पर्यायी मार्ग बनवून त्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र,तसे करण्यात महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहेत.

दरम्यान, आता आम आदमी पार्टीने (AAP) याबाबत पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आपचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष श्रीकांत चांदणे (Shreekant Chandane) यांनी सांगितले कि ”सिंहगड रोडवरील वाहतुकीची रोजची कोंडी हा मोठा विषय झालेला आहे. कोणतेही पर्यायी रस्ते न देता उड्डाणपुलाचे काम चालू करण्यात आलेले आहे. हे काम रात्री न करता दिवसा रहदारीच्या वेळी केले जाते त्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी आम आदमी पक्षाने आधीही आंदोलन केले होते. परंतु वाहतुकीच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्यामुळे आम आदमी पक्ष खडकवासला मतदार संघ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सिंहगड रस्त्यावरील काम रात्रीच्या वेळी करण्यात यावे आणि दिवसा रहदारी साठी रस्ता देण्यात यावा यासाठी हे आंदोलन असेल.”