एक लाख मराठा युवक उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य, नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे , अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

बुधवारी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. पाटील यांनी सांगितले की , महामंडळाच्या ५५६ लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले मात्र प्रमाणपत्र नंतर मिळाले . या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही महामंडळाने घेतला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत असलेली १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून कालावधी परतफेड ७ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे.

मराठा समाजातील छोटे मोठे व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना बळ देण्यासाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार असून त्या अंतर्गत २ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या कर्जावरील व्याज परतावा महामंडळ देईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे ,असे पाटील यांनी नमूद केले. शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. महामंडळ कर्ज योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या संबंधित अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे पाटील म्हणाले.