Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य

Ajit Pawar |  पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याच्या प्रयत्नासोबत रिंगरोडचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडमुळे राज्याच्या कुठल्याही भागातून येणारी वाहने पुण्यात प्रवेश न करता इतर जिल्ह्यात जावू शकतील आणि यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे वडगाव शेरी परिसराचा वेगाने विकास होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात आपल्या आकांक्षा पुर्ण होत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी असा शासनाचा प्रयत्न आहे.  विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. उड्डाणपूलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक कोटी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमातून विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्याने शहराचा लौकीक कायम रहावा यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेथे कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

आमदार टिंगरे म्हणाले, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. गोरगरिबांना हक्काची घरे देण्यासोबत अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसराला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते एकूण १७२ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य