विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे; रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले….

Mumbai – विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात (Pawar Family) अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं त्यांना वाटत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुढील लक्ष्य असू शकतं असा दावा केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही असं ते म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार यांच्या दाव्यासंबंधी विचारलं असता अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं की “रोहितला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे ते विचारतो. पण भाजपा, काँग्रेस, मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं”.