‘गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर, तुला काय…’, अजितदादा काय म्हणाले?

मुळशी- नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटलं की खचाखच गर्दी असते. मात्र पुण्यातील मुळशीत गौतमीचा कार्यक्रम आयोजण्यात आला होता, या कार्यक्रमात गौतमी चक्क बैलासमोर नाचली आहे. सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी भला मोठा स्टेज बांधला होता. मात्र कार्यक्रमाला एकही माणूस उपस्थित नव्हता. परंतु मुळशी गावातील बैलगाडा शर्यतीतील सर्वांचा लाडका बैल बावऱ्यासमोर गौतमी पाटील आणि तिचे सहकलाकार चक्क दोन तास नाचले. असं पहिल्यांदाच घडलं असून सर्वांना आश्चर्य वाटलं.

आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीची बाजू घेत ती बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे, असे वक्तव्य अजित पवारांनी (Ajit Pawar) केले आहे.

“गौतमी पाटील बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास आहे? तिचं काम आहे ती करणार. बैल गाडामध्ये पहिला आलेला हा बैल आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम घेण्यात आला आहे, असं तिला सांगितलं असेल. त्यामुळे तिनेही नृत्य करण्यास होकार दिला असेल. त्यामुळे कुणाला त्रास होण्याचं काय कारण आहे”, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.

“बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही अजित पवारांनी म्हटले आहे.