हिजाबवरून पुण्यात वाद पेटला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदू महासभेची आंदोलने

पुणे : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद आज पुण्यात देखील उमटले आहेत. याठिकाणी हिजाबच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ अशी दोन आंदोलने करण्यात आले आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करण्यात येत आहे तर हिंदू महासभेने हिजाबच्या निषेधार्थ भव्य रँली काढली आहे. त्यामुळे हिजाबचा वाद आता खुपच चिघळत चालला आहे.

पुण्यात गंजपेठेतील फुलेवाडी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कर्नाटक सरकार मुर्दाबादच्या देखील घोषणा दिल्या. यावेळी भाजपच्या विरोधात देखील महिलांनी घोषणा दिल्या आहेत. अजित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असा सुर देखील यावेळी पाहायला मिळला.

हिंदू महासभेने हिजाबच्या निषेधार्थ रँली काढण्यात आली. यावेळी महिलांनी भगवी उपरणे परिधान करत रँली काढली. तर कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब प्रकरणाच्या निषेधार्थ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका खाजगी महाविद्यालयात मुलींनी अनोख्या पद्धतीने हिजाब घालून निषेध नोंदवला. भोपाळ येथील इंदिरा प्रियदर्शनी महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी क्रिकेट आणि फुटबॉल खेळून आपला निषेध व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थिनींनी हिजाब हा आमचा हक्क असून तो आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगितले. हिजाब घालूनच आपण खेळू शकतो, अभ्यास करू शकतो आणि आयएएस होऊ शकतो. सरकारने हिजाब सोडून महाविद्यालयातील अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असेही विद्यार्थिनींनी सांगितले.