तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते परंतु देशहितासाठी मागे घेण्यात आले – मोदी

नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टी लोकांच्या सेवेसाठी सदैव वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला काल संध्याकाळी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की सत्तेमध्ये असताना भाजपा-प्रणित सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्रानुसार काम करत असतं. वर्तमान विधानसभा निवडणुकांबद्दल बोलताना ते म्हणाले की संबंधित पाचही राज्यांमध्ये भाजपासाठी समर्थन मिळणार असं दिसत असून पक्षाला मोठं बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्ष प्रत्येक निवडणुकीतून शिकत असतो आणि त्यासाठी निवडणुका म्हणजे मुक्त विद्यापीठांप्रमाणे असतात ज्यामुळे स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येतात असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. लोक उत्तर प्रदेशातल्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करतात तेंव्हा ते आधीच्या सरकारांच्या काळात त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करत असतात असं उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत बोलताना पंतप्रधानांन म्हणाले.

सध्याच्या भाजपा सरकारच्या काळात दिवसाच्या कोणत्याही वेळी भीती न बाळगता महिला घराबाहेर पडू शकतात. महिलांमधील हा विश्वास त्यांच्यातल्या सुरक्षिततेच्या भावनेचं द्योतक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातल्या सुरक्षेला महत्त्व दिलं आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं.

कृषी कायद्यांबद्दल बोलताना, ते तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते परंतु देशहितासाठी मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण नेहमीच काम केलं असून शेतकऱ्यांनी देखील आपल्याला नेहमीच साथ दिली आहे असंही मोदी यांनी सांगितलं.