कोरोना विषाणूचा नवा प्रकार येण्याची शक्यता – WHO

 नवी दिल्ली – ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा उत्परिवर्तित विषाणू नसून आणखी नवा प्रकार येण्याची शक्यता जास्त आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कोविड-19 चा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य आणि कदाचित आणखी घातक असू शकेल असं आरोग्य संघटनेच्या साथरोगतज्ञ आणि तांत्रिक अधिकारी डॉक्टर मारिया व्हान केरखोव्ह यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

लसीकरण महत्वाचं असून त्यामुळे संसर्ग तसंच आजार आणि मृत्यू पासून या ओमिक्रॉन लाटेत आपलं संरक्षण होतं हे दिसून आलं आहे असं त्या म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेच्या ताज्या अहवालानुसार ओमिक्रॉन या प्रकाराचा प्रभाव वाढत आहे असं दिसून येत आहे. ओमिक्रॉन हा नवा प्रकार सापडल्यापासून 5 लाख मृत्यूंची नोंद करण्यात आली असून हि संख्या दुखःद असल्याची खंत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली.

दरम्यान, देशात सध्या 7 लाख 90 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचं प्रमाण आता घटून 1.86 % झालं आहे. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 96.95 % आहे. कोविड-19 मुळं देशभरात आजवर 5 लाख 6 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यु झाला आहे.