Andheri bypoll: शिंदे गटाची तिरकी चाल; थेट ऋतुजा लटकेंनाच आपल्या बाजूनं वळवणार?

मुंबई- ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. लटके यांना शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडून उमेदवारी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

ABP माझाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. मूरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज अजूनही भाजपकडून भरला गेला नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत.

गुरुवारी ठाकरे गटाकडून (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. मात्र अद्याप ऋतुजा लटके यांचा राजीनामा प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट ठाकरेंना धक्का देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.