‘… तर शिंदे गटाचे फक्त १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात’

Maharashtra Political crises – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आजच्या निकालानंतर शिंदे गटाचे फक्त १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडली आहे. पण लोक फक्त १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत बोलत आहेत. पण प्रत्यक्षात अपात्रतेची टांगती तलवार असलेले ३९ आमदार आहेत असं ते म्हणाले.

आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रथम १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली. त्यानंतर दुसऱ्यावेळी २३ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज आमदारांच्या अपात्रतेबाबत जो काही निर्णय देईल, तो शिंदे गटातील ३९ आमदारांबाबत असेल, असा दावा अनिल परब (Anil Parab) यांनी केला.