निकालाबाबत आई तुळजाभवानीला साकडं घालण्याची गरज नाही – बावनकुळे   

Maharashtra Political crises –   महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या निकालाच्या आधी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. अनेकांनी देवाला साकडे सुद्धा घातले आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मात्र निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त करत आहेत.

आजच्या सुनावणी बाबत बोलताना ते म्हणाले,  जर तर ला काहीच अर्थ नाही. थोड्याच वेळात कोर्टाचा निकाल येईल. आम्ही निश्चिंत आहोत. निकालाबाबत आई तुळजाभवानीला साकडं घालण्याची गरज नाही. येणारी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाणार आहे. 2024 मध्ये ही शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येणार आहे. आम्ही 200 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.