सुषमा अंधारे कार्यकर्त्यांकडे २ लाखांची मागणी करतात,५० हजार दिले तर फेकून देतात – जाधव

बीड : बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी केला आहे. सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. मात्र सुषमा अंधारेंनी हा दावा फेटाळत आपल्याला कोणतीही मारहाण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र अप्पासाहेब जाधव यांनी आपण खरोखरच सुषमा अंधारेंना दोन चापट मारल्याचा दावा केला आहे.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना अप्पासाहेब जाधव म्हणाले, सुषमा अक्कांनी गेल्या १०-१२ दिवसांत खूप दादागिरी सुरू केलीय. त्या थेट ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बोलवून घेतात आणि त्यांच्याकडे २ लाखांची मागणी करतात. सर्वसामान्य शिवसैनिक एवढे पैसे नाहीत असे सांगून आम्ही ५० हजार देतो म्हणत रक्कम दिली. तर मी ५० हजार घेत असते का म्हणत अक्कांनी ते पैसे सरळ फेकून दिले. त्यांनी बऱ्याच कार्यकर्त्यांकडून सोफा घेतला, एसी बसवून घेतला. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत.

मारहाण केल्याचा दावा करताना अप्पासाहेब जाधव पुढे म्हणाले, मी महिलांचा आई-बहिण म्हणून सन्मान करतो. परंतु हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) सांगितल्याप्रमाणे जर तोंडानी बडबड करुन जर समजत नसेल तर थोबाड बडवा. आम्ही सुषमा अक्कांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पदाधिकाऱ्यांना फोन करत सरळ धमक्या देत होत्या. त्यामुळे आम्ही असं सहन केलं नाही. म्हणून मी त्यांना दोन चापटी मारल्या, असे स्पष्टीकरण अप्पासाहेब जाधव यांनी दिला.