खारघर दुर्घटनेला नवे वळण! ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानित आप्पासाहेब धर्माधिकारींनाच अटक करण्याची मागणी

खारघर- ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सुमारे राज्यभरातून २० लाख अनुयायी उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान अनेक अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला. तब्बल ७ तास लाखांहून अनुयायी उन्हात होते. अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. या दुर्दैवी घटनेत १४ निष्पाप अनुयायांचा नाहक बळी गेला.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, शिंदे-फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या विरोधकांकडून करण्यात येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी तर  अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा, अशी मागणी केली होती. यानंतर आता मात्र इतिहासकार श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी चक्क आप्पासाहेबांना अटक करण्याची मागणी केली आहे.

दैनिक प्रभातने दिलेल्या वृत्तानुसार, खारघर येथील दुर्दैवी घटनेत श्रीसेवकांच्या मृत्यूला अप्पासाहेब धर्माधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. याशिवाय या कार्यक्रमात निष्पाप जीव गमावल्याने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दुपारी ४३ अंश सेल्सिअस तापमानात ही घटना घडली. यावेळी श्री सेवकांना २४ तासही पाणी देण्यात आले नाही. मात्र पुरस्कार वितरण करणारे राज्यकर्ते एकाच मंचावर एसीमध्ये उपस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमातील मृत्यू हे नैसर्गिक नसून हत्या आहेत. धर्माधिकारी यांच्या अट्टाहासामुळे दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या अट्टाहासामुळे साधकांचा बळी गेल्याचा गंभीर आरोप कोकाटे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारला मृत श्रीसेवकांबद्दल काही कळकळ असेल तर पोलीस विभागाने धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कोकाटे यांनी याप्रकरणी राज्य सरकारलाही जबाबदार धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आबिडकरांचे पुरोगामी महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप, शिवसेनेने रामदासी संप्रदायाचे विचार लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे, कोकाटे म्हणाले की, शिवसेना भाजप सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अपमान केला आहे.