केजरीवाल यांचे खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली-  दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी आम आदमी पार्टी (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा दिला आहे. खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या केजरीवाल यांच्या विरुद्ध उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका स्वीकारण्यास देखील न्यायालयाने नकार दिला.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने याचिका संपूर्णपणे निरर्थक असल्याचे निरीक्षण नोंदवले आणि याचिकाकर्त्याच्या वकिलांना अशी याचिका दाखल करू नये असे सांगितले. या याचिकेत ‘आप’ची मान्यता निलंबित करण्यात यावी आणि तपास पूर्ण होईपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये AAP आणि त्याचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांचा बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटनेशी शीख फॉर जस्टिस (SFJ) संबंध असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यातून निधीही मिळाला होता.