मालमत्ता कर माफीवरुन काँग्रेस नेत्याकडून सरकारला घरचा आहेर

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ केला आहे. नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे असं ठाकरे यांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र मुख्यमंत्री आणि सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांनी राजधानी दिलेला न्याय ते उपराजधानी नागपुरला का लागू करत नाही असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब नागपुरात स्थायिक झाले आहे. त्या सर्वांचे घर 500 वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशी मागणी केली आहे.