शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू – शरद पवार

नवी दिल्ली – देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केला आहे. राजधानी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) आयोजित अल्पसंख्याक संमेलनात ते बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. काश्मीर फाईल या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगेंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र ज्या लोकांचा हातात सत्ता तेच याचा प्रचार करीत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शरद पवार यांनी केली. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं पवार म्हणाले.

दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यावर देखील शरद पवार यांनीही या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.