राजस्थानात सत्तारूढ काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करणार

मुंबई – राजस्थानात सत्तारुढ काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (Republican Party)भाजप सोबत युती करणार आहे.राजस्थान विधानसभा निवडणुक पुढील वर्षी 2023 मध्ये होत असून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची रिपब्लिकन पक्षाची चांगली तयारी असून भाजप सोबत युती करून राजस्थान मध्ये सत्ता परिवर्तन घडवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी केले.

जयपूर अजमेर येथील ओम विमल गार्डन हॉल येथे रिपब्लिकन पक्षाच्या राजस्थान प्रदेशचे कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि रिपाइं महिला आघाडीच्या मार्गदर्शक सीमाताई आठवले (Seematai Athavle), रिपाइंचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष राधामोहन सैनी, रिपाइंचे राजस्थान प्रभारी ऍड.नितीन शर्मा, दीपक पटेल, नवरतन आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जाती तोडो समाज जोडो ही घोषणा देत समाजात सर्व जातीभेद दूर करण्यासाठी;दलित सवर्ण;दलित ओबीसी ;दलित मुस्लिम सर्वांना एकत्र करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आम्ही देशभर मजबूत करीत आहोत. सर्व राज्यांत रिपब्लिकन पक्षाला बळ मिळत आहे. राजस्थानात रिपब्लिकन पक्षाचा जनाधार वाढत आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आठवले यांनी केले.