साध्वी प्रज्ञांनी ‘द केरला स्टोरी’ दाखवून मन वळवण्याचा केला प्रयत्न, पण हिंदू मुलीने शेवटी मुस्लीम जोडीदारच निवडला

भोपाळ: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) स्क्रीनिंगसाठी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ( Pragya Thakur) यांनी सिनेमागृहात नेलेल्या १९ वर्षीय तरुणीने लग्नाच्या आधी मंडप सोडला आणि प्रियकर युसूफसोबत पळून गेली. विशेष म्हणजे सिनेमाच्या प्रदर्शनानंतर, मुलीला भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र नर्सिंग करत असलेल्या या विद्यार्थिनीने अखेर आपल्या मुस्लीम जोडीदारासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.

केरळ स्टोरी चित्रपटाची कथा ही केरळमधील एका हिंदू महिलेची कथा आहे, जिची भूमिका अदा शर्माने केली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिचे ब्रेनवॉश करून तिला सीरियात पाठवले जाते, जिथे तिला आयएस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते, अशी या सिनेमाची कथा आहे.

हिंदू तरुणी शेजारच्या मुस्लिम तरुणासह पळून गेली
भोपाळच्या नया बसेरा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय हिंदू तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ हा तिचा शेजारी आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफसोबत लग्नापूर्वीच मुलगी पळून गेली होती. ३० मे रोजी मुलीचे लग्न ठरले होते. परंतु ती लग्नासाठी ठेवलेली रोख रक्कम व दागिने घेऊन लग्न मंडप सोडून युसूफसोबत पळून गेली.

मुलीच्या नातेवाईकांनी आरोप केला
भोपाळच्या कमला नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, युसूफने त्यांच्या मुलीला गोड बोलून फसवले आणि नंतर तिला घेऊन पळून गेला. युसूफने मुलीच्या नावावर बँकेचे कर्जही घेतले आणि तिला ईएमआय भरण्यास भाग पाडले, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मात्र, कुटुंबीयांच्या आरोपांच्या विरोधात, मुलीने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, ती हिस्ट्रीशीटर असलेल्या युसूफसोबत पळून गेली होती. ज्याच्या विरोधात सहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत, ती युसूफसोबत कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने पळून गेली होती.