प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत! मुस्लीम तरुणीने धर्मांतर करत हिंदू प्रियकरासोबत केलं लग्न

सीतापुर : यूपीच्या सीतापूरमधून एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. येथे एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केले आहे. दोघेही दोन वर्षांपासून प्रेमात होते. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे मंदिरात हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे विहिंपचे सदस्य या लग्नाचे साक्षीदार होते.

सीतापूरच्या रामपूर मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिस्सार येथील रहिवासी असलेल्या मुस्लिम युवती रुबियाचे ठाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेउडी सेवालिया येथील रहिवासी हिंदू युवक प्रदीप यादव याच्याशी जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रुबियाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. पण रुबिया प्रदीपशी लग्न करण्यावर ठाम होती. रुबिया आणि प्रदीपच्या लग्नातील अडचण विहिंपच्या सदस्यांना कळताच त्यांनी रुबियाचे गाव गाठले आणि पोलिसांच्या मदतीने मंदिरात तिचे लग्न लावून दिले. विहिंपचे धर्माचार्य प्रमुख आचार्य दीपक मिश्रा यांनी मंत्रोच्चार केला आणि दोघांनाही सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

या लग्नापूर्वी रुबियाने तिचे नाव बदलून रजनी ठेवले होते. हिंदू रितीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. प्रदीपने रुबिया उर्फ ​​रजनीच्या भांगेत सिंदूर भरला आणि अग्निला साक्षीदार मानून सात फेरे घेतले. प्रदीप आणि रुबियाने एकमेकांना पुष्पहार घातला. पुष्पहार अर्पण होताच मंदिर परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. यावेळी प्रदीप यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र रुबियाच्या कुटुंबीयांनी लग्नाला हजेरी लावली नव्हती. रुबियाच्या कुटुंबाने त्यांच्या मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. तेथे उपस्थित प्रत्येकजण या लग्नाचा व्हिडिओ देखील बनवत होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अवध प्रांतातील विश्व हिंदू परिषदेचे विभागीय अध्यक्ष विपुल प्रताप सिंग यांनी सांगितले की, दोघेही प्रेमी युगुल एकमेकांवर प्रेम करतात. दोघांनाही लग्न करायचे होते, मात्र मुलीचे कुटुंबीय बळजबरीने तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून देत होते. माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.