भाजपची देशभरातील ताकत वाढणार; जुने मित्रपक्ष एनडीएत करू लागले घरवापसी

नवी दिल्ली – देशात होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांना वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपविरोधात एकत्र निवडणूक रिंगणात उतरण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षही महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर भाजपमध्येही बैठकांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, आता 18 जुलै रोजी एनडीएची मोठी बैठक बोलावण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये होणार आहे.

या बैठकीत अकाली दलाचे सुखबीर बादल, एलजेपीचे चिराग पासवान हे दीर्घकाळापासून एनडीएपासून वेगळे असलेले पक्ष सहभागी होणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपीही या बैठकीत सहभागी होऊ शकतो. सुखबीर बादल आणि चिराग पासवान यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. एनडीएच्या बैठकीला काही नवे पक्षही उपस्थित राहू शकतात.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या बैठकीच्या अनेक फेऱ्यांनंतर नुकतीच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री परिषदेची बैठकही झाली. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या शक्यतेबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान या बैठका झाल्या आहेत. यानंतर भाजपने चार राज्यांतील प्रदेशाध्यक्षही बदलले.