अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजपशी हातमिळवली केली आहे. विश्वासू लोकांनीच दगा दिल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं 40 आमदारांच्या पाठींब्याचं पत्र सादर करत पक्षाचं चिन्ह आणि नावावर दावा करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करत नऊ आमदारांवर – निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एकाबाजूला हा संघर्ष सुरु असताना आता अजित पवारांच्या गटाकडून विविध पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मानकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

दरम्यान, मानकर हे पुण्याच्या राजकारणात कट्टर अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दीपक मानकर यांनी अजितदादांसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. तर विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गटामध्ये कार्यरत राहणार आहेत.