वाचाळवीर चंद्रकांतदादा भाजपासाठी ठरत आहेत अवघड जागेचं दुखणं

 कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) यांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.

दरम्यान, या निवडणुकीतील पराभामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil)  यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. भाजपच्या या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीवेळी आणि त्याआधी केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

कोल्हापुरात पराभव झाला तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. शिवाय निवडणुकीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांच्या खात्यावर पेटीएमद्वारे एक हजार रूपये जरी आले तरी त्याची ईडीकडून चौकशी होऊ शकते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. एवढेच नव्हे तर निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये अशीच वक्तव्ये केली.  चंद्रकांत पाटील यांची हीच वक्तव्ये आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या या वक्तव्यांमुळेच त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.