लोक एकत्र येतील असे सर्व कार्यक्रम रद्द करा; WHO चे सर्वच देशांना आवाहन 

नवी दिल्ली- कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी कडक निर्बंध लावावेत आणि लोक एकत्र येतील असे कार्यक्रम रद्द करावेत असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.

या आवाहनानंतर आता विविध देशांच्या सरकारांनी आणि भारतातल्या राज्य शासनांनी नववर्ष साजरं करण्यावर निर्बंध लावले आहेत. भारतात देखील दिल्लीत लोकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येण्यावर बंधनं लादण्यात आली आहेत. हरियाणात लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या नागरिकांना आजपासून मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कर्नाटकात 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत नागरिकांना एकत्र येता येणार नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा जनतेला दिला आहे. केरळमध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तींना सक्तीच्या गृहविलगीकरणात राहावं लागेल अशी माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. अमेरिका आणि इंग्लंडसह युरोपच्या विविध भागात ओमिक्रॉनचा प्रसार वेगानं होत आहे. हा विषाणू डेल्टा विषाणूपेक्षा किमान तीन पटींनी जास्त संसर्गजन्य आहे.

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात ओमीक्रॉनच्या नव्या ४ बाधितांची नोंद झाली. वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल इथं ओमीक्रॉनची लागण झालेला प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमीक्रॉनबाधितांची संख्या आता 454 वर पोहोचली आहे. त्यापैकी 157 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.