वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली मदत

नवी दिल्ली- जम्मू (Jammu) मधील कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रात्रीच्या सुमारास अचानक गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून भरपाई जाहीर करण्यात आली आहे. माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे. जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात येत असून, एकूण जखमींच्या संख्येबाबत अधिक माहिती स्पष्ट झाली नाही. माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.