यूपीत प्रियांकांचा जलवा ठरणार फेल ?, ओपनिअन पोलच्या आकड्यांमधून आली आकडेवारी समोर

नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटरनं पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेतून भाजपची चिंता वाढवणारे आकडे हाती आले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार युपीमध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश मिळू शकेल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे गोव्यातही भाजप पुन्हा कमळ फुलवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी न्यूज सी वोटरनं केलेल्या सर्व्हेमध्ये यूपीत काँग्रेसची मोठी वाताहत होताना दिसत आहे. या सर्व्हेत काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं सांगितलं गेलं आहे. तर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यताय. 2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. यंदा भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय.